About College

कॉलेजविषयी थोडक्यात माहिती

जून १९५९ मध्ये कंधार येथे मोफत कॉलेज व मोफत बोर्डींग सुरु करुन आमच्या शिक्षण संस्थेने सुवर्ण महोत्सव पुर्ण करून पूढे वाटचाल सुरू केली. पुढे १९६१ ला ई.बी.सी. ग्रँट संबंधीचा प्रश्न उपस्थित झाला व तोहि सुटला. पण विकासोन्मुख महाविद्यालयाचा अवाढव्य खर्च हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे झेपेनासा झाला. प्रारंभ काळात जनतेकडून आर्थिक साह्य मिळाले खरे, संस्थेला १३० एकर जमीन दानशुर विठामाय वडगावे धानोरकर यांच्याकडून दान मिळाली खरी, पण आर्थिक ताण कायम. कॉलेज डबघाईला येवू लागले. या दुरावस्थेच्या परिणामी मराठवाडा विद्यापीठाने १९६४ ला कॉलेजची पाहणी करण्यासाठी डॉ. आर.एस.गुप्ते कमिशन नेमले. कमिशनचा अहवाल प्रतिकूल गेला. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळात अनुकूलप्रतिकूल चर्चा होऊन शेवटी कॉलेजची मान्यता काढून घेण्यात आली. संस्थेवर आकाशीची कुर्‍हाड कोसळल्याचे दुःख ओढवले.

संस्थेने मराठवाडयातील शिक्षण क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या सहकार्याने एकीकडे कॉलेजला पुन्हा मान्यता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, तर दुसरीकडे कॉलेजची आर्थिक डबघाईची परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले. जनतेकडे, शासनाकडे आर्थिक सहकार्याची मागणी सुरु ठेवली. १९६४ साली या डबघाईच्या काळात राधाबाई बुधगांवकर यांच्या लोकनाटय मंडळाने आमच्या कॉलेजच्या आर्थिक साहाय्यासाठी बारुळ, कवठा, कलंबर येथे प्रत्येकी एक तर कंधारला तीन प्रयोग देऊन भरघोस आर्थिक साहाय्य केले. जनतेकडूनही हळू हळू प्रतिसाद मिळू लागला.

तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मान्यता काढून घेतली, प्रविष्ट झालेले विद्यार्थी त्यांचे पालक, प्राध्यापक,  शिक्षकेत्तर बांधव व संस्था या सर्वांचीच स्थिती हवालदिल झाली. अखेर विद्यापीठ मान्यता देत नसेल तर भारतातील इतर कोणत्याही विद्यापीठाकडे संलग्नतेसाठी आम्ही प्रयत्न करु, पण कॉलेज बंद पडू देणार नाही असा अटीतटीचा निर्णय संस्थेने घेतला, व हा निर्णय मराठवाडा विद्यापीठाला व महाराष्ट्र शासनाला तातडीने कळविला, दरम्यान विद्यापीठाने काढून घेतलेली मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून आमदार श्री केशवरावजींनी श्री गुरुनाथराव यांना सोबत घेऊन मुंबई गाठली व महाराष्ट्र शासनाचे दार ठोठावले.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री वसंतराव नाईक व शिक्षणमंत्री मा.ना.श्री मधुकरराव चौधरी यांना भेटून कॉलेजची पूर्ण परिस्थिती त्यांना कथन केली व कॉलेजला मान्यता देण्यासाठी विनंती केली. या विनंतीला मान देऊन, सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन उभय नामदार महोदयांनी कॉलेजला मान्यता दिल्यासंबंधीचा शासकीय आदेश काढला. एवढेच नव्हे तर ना. मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री निधीतून रु. ५०००/ रु. पाच हजारांचा चेक कॉलेजला अर्थ सहाय्य म्हणून प्रत्यक्ष भेटीतच दिला, व या सत्कार्याला आपला सर्वतोपरी पाठिंबा व्यक्त केला.

कॉलेज मान्यतेचा हा प्रश्न एकीकडे असा बिकट होऊन बसलेला, तर दुसरीकडे मा.आ.श्री केशवराव धोंडगे साहेबांना प्राणप्रिय असलेल्या त्यांच्या पुण्यश्लोक मातोश्री मुक्ताई धोंडगे ह्या आत्यंतिक आजारी अवस्थेत अंथरुणाला खिळलेल्या ! प्रकृति तोळा मासा ! आईच्या पायाशी तिला धीर देत राहावे ही इच्छा त्यांना प्रबळ असलेली, तर दुसरीकडे कॉलेजला मान्यता मिळविण्यासाठी अधीरलेले मन ! नितांत प्रिय मातोश्रीला जीवनदान मिळविण्यासाठी थांबावे तर कॉलेजचा मृत्यू नजरेसमोर दिसतो आहे. कॉलेजला जीवनदान मिळविण्यासाठी मुंबई गाठावी तर पू. मातोश्रींचा चिर विरह सोसावा लागतो की काय हा प्रश्न भेडसावीत असलेला ! प्रचंड भावनिक वादळांनी निर्माण केलेल्या दोन वातचक्रांमध्ये सापडलेले केशवराव ! ना आल्याड, ना पल्याड या स्थितीत.

तर उलट च्माझ्या प्रकृतीचे वा माझे कांहीही होवो, अगोदर कॉलेज वाचव ! मी तुझी जन्मदात्री आई आहे, पण कॉलेज ही अनेक गोरगरीबांच्या लेकरांची आई आहे, तिला वाचव ! तिला वाचव !छ ही पुण्यश्लोक मातोश्रींच्या र्‍हदयांतिक तळमळीची इच्छा मृत्यूंच्या दारात उभ्या असतांना त्यांनी व्यक्त केलेली इच्छा व कॉलेजला मान्यता मिळविण्याची त्यांची तळमळ लक्षात घेवून मा. श्री केशवराव धोंडगे साहेबांनी श्री गुरुनाथरावजी कुरुडे यांना सोबत घेऊन कंधार सोडले व मुंबई गाठली व कॉलेजला महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळविली हे वृत्त आम्ही यापूर्वी वर्णिलेलेच आहे.

या प्रसंगी श्री केशवरावजींचे शरीर मुंबईत, पण मन व प्राण मात्र क्रांतिभुवन बहाद्दरपुर्‍यात आईच्या अंथरुणाशेजारी घिरटया घालीत होते ! दोन पातळयांवरील या संघर्षाचे वर्णन करावयास शब्द सुध्दा तोकडे पडतात. मुंबईत मुख्यमंत्री मा.ना. श्री वसंतराव नाईक व शिक्षण मंत्री मा.ना. श्री मधुकरराव चौधरी यांना भेटून कॉलेजची सर्वांगीण परिस्थिती त्यांच्यापुढे ठेवून कॉलेजला मान्यता मिळविण्याची जिद्द व आपली पराकाष्ठा ते करीत होते. उभय मंत्रीमहोदयांना श्री केशवरावजींच्या त्यागपूर्ण कार्याची व या कार्याबद्दलच्या त्यांच्या र्‍हदयांतिक तळमळीची पूर्ण कल्पना होती. नियमांवर व कायद्यांवर बोट ठेवून ग्रामीण भागातील तळमळीने शिक्षण दानाचे कार्य करणारी संस्था बंद होता कामा नये हे उभय मंत्रीमहोदयांनी निश्चित केले व आपल्या अखत्यारीत कॉलेजला मान्यता देण्याविषयीचा आदेश जारी केला.

मुंबईत लढाऊ संघर्ष देऊन कॉलेज मान्यते संबंधात श्री केशवरावजी एक एक पायरी जिंकत होते, तर आईच्या प्रखर आजारा संबंधात प्रत्येक क्षण हरत होते. तिकडे कॉलेजला जीवदान मिळाले, हे वृत्त तीव्र आजाराने क्षीण झालेल्या मातोश्रींना समजले. च्माझ्या बापूच्या हाताला यश आलेछ या शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. श्री केशवरावांच्या आगमनाकडे मातोश्रीचे डोळे लागले होते. परंतु विधीलिखित कांही वेगळेच घडले. मुलाला आईशी शेवटचे दोन शब्द बोलण्याची संधी क्रूर काळाने दिलीच नाही. श्री केशवराव मुंबईतच असतांना मातोश्रींचे इकडे प्राणोत्क्रमण झाले.

श्री केशवरावांनी भावी पिढयांसाठी तेजोमय प्रकाश मिळविला, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनांत मातृविरहाची कायमची निबीड अंधःकाराची गडद छाया पडली ! मायेची सावली विरुन गेली ! मातृछत्र उडाले ! जीवन पोरके झाले ! कॉलेजला जीवदान मिळाल्याची आरोळी ठोकीत असतांनाच मातेच्या मृत्यूची जाणीव होतांच करुण किंकाळीचा टाहो फुटला ! मायेच्या प्रेमाचा वाहता निर्झर आटला !

गड आला, पण सिंह गेला !

घ्स्वामी तिन्ही जगाचाआईविना भिकारीङ ठरला.

कर्तृत्वाने कॉलेज परत दिले,

दुर्दैवाने आई कायमची नेली !

आईविना पोरकेपण कधी ना कधी अटळ होते, पण मृत्यूने ही वेळ टाळावयास हवी होती ! अशी साधावयाची नव्हती ! मुलगा मुंबईत रणांगणावर सर्व शक्तीनिशी लढा देत असतांनाच मातोश्री मुक्ताबाईंनी इकडे इहलोकीचे मुक्तांगण पार केले. श्री केशवरावांवर आकाशीची कुर्‍हाड कोसळली. मर्मावर बसलेल्या या घावाची जखम आजही भळभळून वाहते आहे, शेवटपर्यंत ती वाहत राहणार आहे ! तिचे विस्मरण होणे नाही !

काळाच्या प्रवाहात जखमा भरुन निघतात, वाळतात हे खरे, पण त्यांचे व्रण मात्र कायमचे राहतात. ते चिरस्मृती ठरतात !

कॉलेजच्या मान्यतेला रीतसरपणा येण्याच्या दृष्टीने शासनाचा आदेश मिळतांच मराठवाडा विद्यापीठाने डॉ.आर.एस.गुप्ते व डॉ. के.ए.ठकार यांच्या द्विसदस्य पाहणी मंडळाची नियुक्ती केली. या पाहणी मंडळाने दि. १० व ११ फेब्रुवारी, १९६५ ला कॉलेजला भेट देऊन आपला अहवाल विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाने रीतसर मान्यता पाठविली व कॉलेजचे पुनरुज्जीवन झाले.

Looking to buy Bitcoins with Paypal and don’t know where to start? This guide will teach you everything you need to know about buying Bitcoins safely.

प्रतिकुल परिस्थीतीवर मात केलेल्या कॉलेजने नव्या जोमाने व ताज्या दमाने हळू हळू बाळसे धरावयास प्रारंभ केला. महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री सर्वश्री कै. ना. श्री वसंतराव नाईक, ना. श्री वसंतदादा पाटील, ना. श्री शरदराव पाटील, ना. बॅ. श्री ए. आर. अंतुले यांनी वेळोवेळी आपल्या मुख्यमंत्री निधीतून कॉलेजला अर्थसाह्य दिले. जनतेकडूनही अर्थसाह्याचा प्रतिसाद मिळू लागला. विद्यार्थी संख्येत हळू हळू वाढ होऊ लागली, तसे नवे अभ्यासक्रम व प्राध्यापक वृंद वाढू लागला. जागा अपूरी पडू लागली. म्हणून श्री शिवाजी हायस्कूल, कंधारने बांधलेल्या नवीन इमारतीत कॉलेज स्थलांतरित केले.

कॉलेजला स्वतःची भव्य वास्तू असावी असे वाटावयास लागले. संस्थेने अविरत प्रयत्न करुन शासनाकडून १६ एकर १६ गुंढे जमीन मिळविली. नवीन इमारतीचा पाया भरला, भव्य वास्तूचे स्वप्न साकार व्हावयास प्रारंभ झाला. विद्यापीठ अनुदान मंडळाने इमारत बांधणीसाठी रु. २,४८,०००/ (दोन लक्ष अठ्ठे चाळीस हजार रु.) चे अनुदान दिले. हे अनुदान व इतर देणग्यांच्या आधारे इमारत उभारली.

१९६६ साली वाणिज्य विभाग, १९७२ साली विज्ञान विभाग व १९७३ साली इतिहास विषयाचा पदव्युत्तर विभाग कॉलेजने सुरु करुन कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखा व पदव्युत्तर शिक्षण येथपर्यंत मजल गाठली. कॉलेजचे वरील सर्व अभ्यासक्रम जोमाने सुरु राहिले. तसेच २००४२००५ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर समाजशास्त्र, शैक्षणिक वर्ष २००६२००७ मध्ये स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड यांनी इतिहास संशोधन केंद्गास मान्यता दिली आहे. सदरील इतिहास संशोधन केंद्गातून आज पर्यंत २० विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी व ५ विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी संशोधन केंद्गाचे संचालक डॉ. अनिल कठारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली आहे. पदव्युत्तर एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र हे अभ्यासक्रम १९९११९९२ पासुन महाविद्यालयात नियमित सुरु आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे अभ्यासकेंद्ग महाविद्यालयात शै. वर्ष २००२०३ पासुन कार्यरत आहे.

महाविद्यालयीन शिक्षणात तसेच एकंदर मानवी जीवनात ग्रंथ हे खर्‍या अर्थाने गुरु आहेत ही अपार श्रध्दा ठेवून आम्ही कॉलेजचे ग्रंथालय जाणीवपूर्वक सर्वांगांनी वाढविण्याचे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत आमच्या ग्रंथालयात ५६,००० ग्रंथ आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषांमध्ये एकूण २८ दैनिके व ३६ साप्ताहिके व नियतकालीके महाविद्यालयात नियमितपणे येतात. आमच्या ग्रंथालयाचा सुसज्ज संदर्भविभाग पाहून अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व विचारवंतांनी कौतुक केले आहे. अनेक दुर्मीळ ग्रंथ आज आमच्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत.

श्री शिवाजी कॉलेज कंधारने गेल्या ५७ वर्षात केलेल्या शैक्षणिक कार्याच्या प्रगतीचा आलेख आपणा समोर ठेवला आहे. ग्रामीण भागात अनेक खडतर परिस्थितींना तोंड देत विकासाची वाटचाल करणार्‍या व अनेक संस्थांचे जाळे पसरवून शैक्षणिक कार्य अविरतपणे करणारे असे हे कॉलेज आपणा सर्वांच्या सहकार्यांवर सुवर्ण महोत्सवाचे वर्ष पार पाडून पुढे आगेकुच करीत आहे.    जयक्रांति !  जय मुक्ताई !